आदिम काळात माणूस निसर्गाशी सर्जनशील नात्यात निसर्गनियमाने जगत होता . निसर्गावर प्रक्रिया करून,निसर्गावर प्रभुत्व निर्माण करून माणसाने आपले आयुष्य सुखकर बनवण्यास सुरुवात केली . आपले आयुष्य अधिकाधिक सुखकर बनवण्यासाठी त्याने निसर्गाला क्रूरपणे ओरबाडण्यास सुस्र्वात केली . यातून निसर्ग उध्वस्त झालाच परंतु माणूस निसर्गाचा एक घटक असल्यामुळे त्यालाही याच्या झळा सोसाव्या लागत आहेत व लागतील !
भाषा, व इतर सांस्कृतिक शोधांपूर्वी आदिम काळात प्राणिज पातळीवर असताना आपण पूर्णतः निसर्गावर अवलंबून होतो. आजच्या सत्ता व संपत्तीच्या संघर्षमय वातावरणात माणूस कधी कधी सामाजिक बंधनांना झुगारु पाहतो , तोडू पाहतो ,खुला होऊ पाहतो;परंतु अशी काही व्यवस्था अस्तित्वात नाही कि जी आपल्याला हे बंध तोडून मुक्तपणे जगण्यास पूरक ठरेल. आपले जगणे संघर्षमयी सृजनात्मक न राहता ते फक्त संघर्षात्मक झाले आहे . हरेक दिवस आपल्याला टोकाच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. यातून कुणाच्या वाट्याला अपयश तर कुणाच्या वाट्याला यश येणे साहजिक आहे . नोकरी , प्रेम,सत्ता - संपत्ती संघर्ष ,नाती व नात्यांच्या फसवणुकीतून येणारी विफलता आपले मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत होऊ शकते. अशा वेळी सत्ता-संपत्ती,नाती इ. संघर्षाच्या पलीकडे;नैसर्गिक शक्यतांच्या अवस्थेत जगणारे कित्येक लोक आपल्याला दिसतात . आपण त्यांना मनोरुग्ण म्हणतो . घर सोडून कुठेही भटकत असणारे हे मनोरुग्ण कुणी दिले तर खायचे नाही तर उपाशी कुठेही झोपायचे अशा प्रकारे जगत असतात .
२०१४ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला एक फोन आला कि 'रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला गेली ४-५ दिवस पडून आहे. ती अजिबात हालचाल करत नाही . बहुतेक ती मेली असावी . तुम्ही मनोरूग्णांसाठी काम करता म्हणून तुम्हाला फोन केला '. मला धक्का बसला कारण ज्या महिलेला मी गेली १०-१२ दिवस खायला देत होतो ; ती मला गेले ४-५ दिवस अजिबात दिसली नव्हती. हि तीच महिला असणार यात शंका नव्हती .तिची शारीरिक अवस्था फारच कृश होती, त्यामुळे मलाही ती जिवंत असेल का असे वाटले . घरातून बाहेर पडतानाच मी रुग्णवाहिकेला फोन केला . घटनास्थळी पोहचल्यावर मी तिचा शोध घेतला . मुख्य रस्त्याला खेटून असलेल्या कुंपणाशेजारी ती पडलेली दिसली . तिच्या अंगावर एक प्लास्टिकचा कागद होता . मी अंगावरचा प्लास्टिकचा कागद बाजूला केला तेव्हा तिची थोडीशी हालचाल झालेली पाहून मला दिलासा मिळाला . तिथल्या दोन स्थानिक तरुणांच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेत चढवले . तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हते.भर पावसात ती ४-५ दिवस पडून होती . तिच्या अंगाखाली किड्यांनी निवारा केला होता . इतक्या दिवसांत या रस्त्यावरून कित्येक लोक गेले असतील पण कुणालाच तिच्याबद्दल माणुसकीचा उमाळा दाटला नाहि.
ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर तिचे पूर्ण भिजलेले कपडे तिथल्या एका सिस्टरच्या मदतीने काढले . तेव्हा चे शरीर म्हणजे हाडांना चिकटवलेली कातडी असे तिचे वर्णन होऊ शकत होते .तिथल्या एका सिस्टर व वार्ड बॉय यांनी मिळून तिला गरम पाण्याने आंघोळ घातली . तिला नवीन कपडे घालून खाटेवर झोपवले आणि तिला सलाईन लावण्यात आले. मी काही फळे तिला खायला आणून दिली, तिने ती खाल्ली आणि झोपी गेली . दोन दिवस तिला फळे आणि वरणभात खायला दिल्यानंतर तिच्या अंगात थोडी ताकत आली . पण दोनच दिवसांनी हॉस्पिटल मधून मला फोन आला कि आम्ही हिला जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये ठेऊ शकत नाही ,तेव्हा या महीलेचा दुसरीकडे कुठेतरी बंदोबस्त करा . माझ्या विनंतीवरून त्यांनी तिला कर्मचा-यासाठीच्या क्वार्टर्समधल्या एका रिकाम्या खोलीत ठेवले . रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी सांगितले कि ' तिचा आम्हाला कंटाळा आला आहे ' …. उपचार मिळणे तर लांबची गोष्ट ! वास्तविक रुग्णालयाने माणुसकीच्या नात्याने तिच्या उपचार व सेवेकडे लक्ष द्यायला हवे होते. पण त्यांनी तिला हॉस्पिटलच्या आवारात ठेवणे हा माझ्यासाठी माफक आधार होता. या काळात मी तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देऊ शकणार होतो.
मी काही मित्रांच्या मदतीने रोज तिथे जाऊन तिला खायला द्यायला लागलो . या काळात मी तिच्याशी संवाद साधत राहिलो. ती भोजपुरी भाषेत बोलते हे मला कळल्यानंतर मी तिला हिंदीत नाव गाव विचारले तेव्हा तिने आपले नाव कलावती आहे असे सांगितले व गाव कुरा असल्याचे सांगितले. मी त्याप्रमाणे सलग ५ दिवस भोजपुरी भाषा बोलली जात असलेल्या कुरा गावाचा इंटरनेटवर शोध घेण्याचा प्रयत्न केला . पण अपेक्षित यश आले नाही . या काळात आज-यातल्या खुपश्या समाजवादी लोकांकडे मदतीसाठी याचना केली ; पण सर्वांनी 'करूया','बघूया' म्हणून दिलासा देण्यापुरतीच काय ती मला मदत केली. मी तिच्या योग्य उपचार व पुनर्वसनासाठी फार गंभीर होतो. तेवढा गंभीरपणा मी काही लोकांकडून अपेक्षित धरत होतो हे तसे चुकीचे होते. काहींनी तर मला असे म्हटले कि आमची चळवळ व्यापक मानवतेसाठी आहे, समाज बदलला पहिजे वगैरे… पण मी माझे प्रयत्न थांबवले नाहीत . तब्बल ८ दिवसांनी मला श्रद्धा फौंडेशन, कर्जत या संस्थेबद्दल इंटरनेटवर माहिती मिळाली . हि संस्था रस्त्यावरून भटकणा-या मनोरूग्णांसाठी काम करते . त्यांच्या वेबसाईटवर मिळालेल्या फोन नंबरवरती मी फोन केला आणि मला अपेक्षित प्रतिसाद मिळाला . इतक्या दिवसांत मी कित्येक ngo ना इ मेल केले, फोन केले पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद लाभला नव्हता .त्यामुळे श्रद्धा फौंडेशन, कर्जत या संस्थेकडून मिळालेला प्रतिसाद फार मोलाचा होता. फोन केल्यापासून तिस-याच दिवशी श्रद्धा फौंडेशन, कर्जतचे चेतन दिवाण आणि आकांक्षा मिश्रा हे दोन मनोसामाजिक स्वयंसेवक आज-यात दाखल झाले . त्यांनी तिची शारीरिक अवस्था पाहिल्यानंतर 'आम्ही पेशंटला घेऊन जाऊ' असे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला . कारण कलावती आज्जीवर आता योग्य उपचार होणार होते व तिचे पुनर्वसन पण होणार होते .
या काळात मी आजा-यातील लोकांकडून आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली . ८३०० रु. जमा झाले . या रकमेतून या महिलेला रुग्णवाहिकेतून कोल्हापूर व तिथून कर्जतला नेण्यात येणार होते . मी स्वतः व माझा एक मित्र एकनाथ जाधवला माझ्याबरोबर घेतले आणि आम्ही कोल्हापूरपर्यंत रुग्णवाहिकेतून आलो . कोल्हापुरातून रेल्वेने कर्जतपर्यंतच्या प्रवासात कलावती आज्जीने 'आपले गाव आले असून मला इथे उतरा' असा हट्ट धरला होता .पण आकांक्षा मिश्रांनी तिच्याशी भोजपुरीतून संवाद करत 'गाव अजून दूर आहे तू झोपी जा' असे सांगितले . आमच्या डब्यात चढणारा प्रत्येक प्रवाशी आमच्याकडे आणि कलावती आज्जीकडे आश्चर्याने पहात होता . कुणीतरी चौकशी करून आमच्या कामाला शुभेच्छा देऊन जात होता. मला या स्वयंसेवकांबद्दल आदरयुक्त आपुलकी निर्माण झाली होती . तिच्या आहारावर चेतनभाऊंचे लक्ष होते. आकांक्षा मिश्रा कर्जत येईपर्यंत न थकता तिचे खराब झालेले कपडे बदलून तिला स्वच्छ करत रहिल्या . मी त्यांच्या सेवाभावी वृत्तीला सलाम केला .
सकाळी ५. २३ वाजता आम्ही कर्जतमध्ये पोहोचलो. श्रद्धाची रुग्णवाहिका आली होतीच.कलावतीला त्यात चढवले तिच्यात अम्बुलन्समध्ये स्वतःहून चढण्यात क्षमता नव्हती. रुग्णवाहिका श्रद्धा फौंडेशन च्या गेटमधून आत वळली तेव्हा नुकतेच उजाडत होते.पुनर्वसन केंद्रात कोणी जागे नव्हते. आम्ही कलावतीला महिलांच्या वार्डमध्ये झोपवून फ्रेश होऊन चहा घेण्यासाठी गेस्ट रूममध्ये आलो.इथे श्रद्धा पुनर्वसन केंद्रातल्या बाकीच्या मनो सामाजसेवकांशी ओळख झाली .
दुपारी युसुफ फरास ह्यांनी संपूर्ण पुनर्वसन केंद्रात फिरवून माहिती दिली . त्यांचा प्रत्येक रुग्णाशी सहसंवेदन संवाद मला भावला . युसुफभाई मला म्हणाले कि 'ह्या रुग्णांना घरी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या चेह-यावर जो आनंद दिसतो यापेक्षा या दुनियेत मोलाची गोष्ट दुसरी कुठली वाटत नाही' . चेतनभाऊंनी ह्या रुग्णांच्या आहार व उपचारांबद्दल मला माहिती दिली .चेतनभाऊच्या संवादातून अगदी निर्व्याज व ओघवता मनोसामाजिक स्वयंसेवक मला जाणवला . स्वच्छ कपडे घातलेले , बरे झालेले काही रुग्ण इतर रुग्णांना जेवण वाढत होते . ज्या रुग्णांना आपल्या हातांनी खाता येत नाही त्या रुग्णांना दुसरा एक रुग्ण भरवत होता . हे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आले . कारण आई बाबा वृद्ध झाल्यानंतर त्यांचा व आपल्या घरातील विकलांग लोकांची सेवा करताना कित्येक लोकांना कोरडेपणाने वागताना मी पहिले आहे. या सेंटरमध्ये या रुग्णांमध्ये मी निरपेक्ष प्रेम पाहिले .
या संस्थेच्या डॉ .स्मिता वाटवाणी रुग्णांना पाहण्यासाठी, त्यांच्या उपचारांची माहिती घेण्यासाठी आल्या. त्या प्रत्येक रुग्णाशी संवाद करत त्यांच्या सध्याच्या स्थितीबाबत इतर मनोसामाजिक स्वयंसेवक व डॉक्टरांकडून माहिती घेऊ लागल्या. एक एक रुग्ण यायचा आणि त्याच्या मनात ज्या ज्या गोष्टी उफाळून येत होत्या त्या तो सांगत होत. कुणी रडत होता,कुणी गावाकडे कधी जायचे विचारत होता आणि आणखीही भरपूर साठवलेले … रुग्णामधला प्रत्येकजण डॉक्टरंच्याबद्दल फार आत्मियतेने वागत होते. क़ित्येक रुग्णांच्या अंगावर तीव्र घाव होते . कुणाच्या डोक्यात कुणाच्या हातावर ,पायावर वगैरे . ह्या जखम ब-या झाल्या असल्या तरीही खुणा मात्र स्पष्ट होत्या . मनोरुग्णांच्या डोळ्यांमध्ये घरी जाण्याची तीव्र ओढ दिसते . पण कित्येक स्त्री मनोरुग्णांच्या वाट्याला ओळखी-अनोळखीच्या नात्यांतून फसवणूक आलेली आहे . कित्येकींना हुंडा किंवा इतर कारणांसाठी मारहाण करून घरातून हाकलले , कित्येकींना मानव तस्कीरीच्या छळाला तोंड द्यावे लागले असेल किंवा आणखीही खूप कारणे …पुरुष मनोरुग्णांमध्ये हात तुटलेला एक व बोटे तुटलेला एक मनोरुग्ण मला दिसला ,कित्येक मनोरुग्णांच्या डोक्यात,हातावर , पायावर खोल घाव आहेत . हे घाव अपघातातले नसून घातपातातले आहेत हे कुणाही माणसाला जाणवेल . हे सर्व बघितल्या नंतर मी पार हेलावून गेलो . इथल्या प्रत्येकाची एक दु:खद कहाणी आहे . ती ज्याला आठवेल तो/ती त्याच्या / तिच्या घरी जाईल ज्यांना आठवणार नाही ते इथेच राहतील . १० - १५ वर्षांपासून इथेच रहात असलेले कित्येक रुग्ण इथे आहेत . अशा रुग्णांना त्यांना जमतील अशी कामे विभागून दिली आहेत . काही जण गाईंचा गोठा सांभाळतात , काही जण शेतात काम करतात , काही जण वार्डात एकमेकांना सांभाळण्याचे काम करतात . आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या जबाबदा-या हे सर्वजन आनंदाने पार पाडतात, कोणतीही चूक न करता अगदी निट ! या मनोरुग्णांच्या भावना आणि जाणिवांच्या दिशेने संवाद व्हायला हवा . मी चेतनभाउंशी संवाद करत होतो तेव्हा एक बरा होत असलेला रुग्ण जवळ आला आणि चेतनभाऊंना म्हणाला कि , 'सर सर्व पेशंटना पावसात भिजायचे आहे, जाऊ का ?' चेतनभाऊंनी आनंदाने त्याला परवानगी दिली . मला अतिशय कौतुक वाटले . हे सर्वजन मनोरुग्ण टी.व्हि. वरच्या मालिका बघतात , गाणी म्हणतात. त्यांचा पूर्ण दिनक्रम अतिशय मजेत व्यतीत होतो . परंतु या दिनक्रमामध्ये त्यांच्या गोळ्या औषधांची काळजी घेणारे डॉक्टर , त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांनी निगा राखणारा पूर्ण स्टाफ या सर्वांना दाद दिलीच पाहिजे .
आमचे परतीचे रेल्वेचे तिकीट आरक्षित असल्यामुळे आम्हाला रात्री ९. ३० वाजता पुनर्वसन केंद्रातून निघावे लागणार होते ; पण पाय उचलत नव्हता . मी जेवलो नाही . तिथल्या सर्व स्वयंसेवकांशी आणि मनोरुग्णांशी एक बंध तयार झाला होता . कलावतीचा निरोप घेताना डोळ्यांत पाणी आले . गाडीतून येताना ब-याच गोष्टींचे काहूर मनात माजले होते . समाजसेवेचे ढोंग करून देणग्या लाटणारे आणि पेपर , TV चानेलांवर झळकणारे खूप पाहिलेत आपण; पण डॉ . रवी कोल्हे , जी . पी . भगत , मुरुगन एस , डॉ . भरत वाटवाणी , सिंधुताई सपकाळ , डॉ . प्रकाश आमटे , रवि बापटले , संतोष गर्जे , मातीन भोसले यांसारखे व यांच्यासारखे प्रत्यक्ष कार्यावर अढळ व निस्सीम श्रद्धा ठेवणारे आणि त्यासाठी वाहून घेऊन जगणारे किती आहेत आपल्यात ………. ?
रस्त्यावरून फिरणारे मनोरुग्ण कुठेही झोपतात ,काहीही खातात त्यांच्या जगण्याच्या कुठल्याही दिशा असत नाहीत . खुपदा आपण अशा लोकांना टाळतो , त्यांच्याकडे पाठ करून उभे राहतो . १ - २ रुपये फार तर १० - २० रुपये देऊन फार कनवाळू असल्याच्या अविर्भावात आपण राहतो . काही जण फार तर त्यांना केस कापतात ,अंघोळ घालतात , कपडे देतात आणि जेवू घालून जिथून नेले तिथेच आणून सोडतात . अशी कृत्ये बातमीसाठी चांगली असली तरी प्रत्यक्षात पुनर्वसन शून्य टक्के .
आपल्यासारखा कोणी माणूस आपल्याकडे काही खायला मिळावे म्हणून दया याचना करतो आणि आपण त्यांच्या खराब कपड्यांकडे पाहून त्याला हुसकावतो हि कुठली आपली मानवियता ? अशा लोकांबद्दल आपल्याला संवेदना असायला हवी . मानवमुक्ती , शोषणमुक्ती सारख्या चळवळीमध्ये काम करणारया लोकांकडेसुद्धा असा भाव असतो का नाही हा मोठा प्रश्न आहे , कारण माझा अनुभव वेगळा आहे .
कलावती आज्जीशी एक वेगळीच भावनिक गुंतागुंत तयार झाली होती. दरवेळेला ती सुस्कारे टाकत काहीतरी असायची . मी तिचे खराब कपडे बदलत असताना तिला मी तिच्या मुलाप्रमाणे प्रतिसाद देत होती . इतक्या दिवसांत माझ्या अवतीभवतींच्या लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली होती . मला टाळून काही जन जात होते तर काही माझे कौतुक करत होते . मी मात्र मनात एक पुटपुटत होतो कि मला माझ्या कामाची लाज वाटता कामा नये ; लाज त्यांना वाटली पाहिजेत जे माणुसकीला न जागता अशा लोकांना टाळून पुढे जातात .
युसुफभाऊ मला म्हणाले कि जेंव्हा हे लोक बरे होतात आणि त्यांच्या घरी त्यांना नेण्यात येते तेव्हा कित्येकदा ते कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाहीत . यावेळी वरिष्ठ मनोसामाजिक स्वयंसेवक चेतन दिवाण म्हणाले कि संबंधितांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करावे लागते त्यांना हे पटवून द्यावे लागते कि मनोरुग्ण व्यक्ती आता पूर्ण बरी झालेली आहे . तेव्हा कुठे हे 'रियुनियन ' शक्य होते .
'श्रद्धा फौंडेशन' च्या मन्सूर रिझविंचा एक दिवस मला फोन आला आणि त्यांनी मला माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी दिली . त्यांनी सांगितले कि ,कलावतीला बरे करून तिच्या गावात सुखरूप पोहोच करण्यात आले आहे . कलावतीच्या घरी तिचे नातेवाईक आहेत . ते सर्व खूप खुश झाले वगैरे …. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही . मी माझ्या आयुष्यात इतका खूष कधी झालो नाही आणि होऊ हि शकत नाही . सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिला दाखल करण्यात आले होते आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती बरी होऊन घरी गेली . या प्रसंगाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली . आजही कलावतीचा पहिल्यांदा दिसलेला चेहरा आठवतोय मला … कलावती त्यावेळी बसस्थानकाच्या बाजूच्या गटारातील पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती …! मी ' रुको , पाणी लाता हुं ' म्हणेपर्यंत तिने त्या गटारातील पाण्याचा एक घोट पिला होता …. अंगातून वीज सळकल्यागत मला तेव्हा झाले होते . तो क्षण आजही मी विसरू शकत नाही !




